प्रतिनिधी / बेळगाव
टोपलीतील सर्प दाखवून पैशांची मागणी करणाऱया एका मद्यपी गारुडय़ाला बुधवारी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने वनरक्षकांनी पकडले. त्याच्याकडे असलेल्या नाग सापाची सुटका केली.
शहराच्या मध्यभागी असलेल्या कसाई गल्लीमध्ये टोपलीत साप घेऊन पैशांची मागणी करणारा गारुडी सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला होता. सापाच्या नावाखाली मिळालेले पैसे हा गारुडी दारू ढोसण्यासाठी करत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनी ही माहिती तातडीने वनखात्याला दिली. वनखात्याचे अधिकारी व वनरक्षकांनी तातडीने दाखल होऊन दारूसाठी पैसे उकळणाऱया गारुडय़ाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या नाग सापाची सुटका केली आहे. यावेळी वनविभागाचे श्रीकांत देसाई यासह वनरक्षक व सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर उपस्थित होते.