कुल्फी म्हटली की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. मस्त गारेगार कुल्फी खाताना खूप मजा येते. कुठे बाहेर गेल्यावर आईसक्रीमपेक्षाची कुल्फी खाण्याचा मोह होतो. केशर-पिस्ता, मलई, पिस्ता, रोझ, स्ट्रॉबेरी, चिकू, सीताफळ अशा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये मिळणारी कुल्फी तुम्ही घरीही करू शकता. यापैकी कोणताही फ्लेवर नको असेल किंवा उपलब्ध साहित्यातून कुल्फी करायची असेल तर तुमच्याकडे बनाना कुल्फीचा पर्याय आहे. ही कुल्फी चविष्ट लागतेच शिवाय ती हेल्दीही आहे. केळ्यातलं पोटॅशियम आणि दुधातलं कॅल्शियम एकत्र मिळवण्यासाठी बनान कुल्फी नक्की करा. फक्त दहा ते पंधरा मिनिटात कुल्फीचं मिश्रण तयार करून साच्यात भरता येईल. तर झटपट होणार्या बनाना कुल्फीची
ही रेसिपी…
साहित्य : दोन कप दूध, एक कप कंडेन्स्ड मिल्क, दोन केळी, अर्धी वाटी मलई/साय, अर्धा चमचा वेलची पूड, केशराच्या चार ते पाच काडय़ा, साखर आणि काजू-बदामाचे तुकडे. कृतीः सर्वात प्रथम केळ्याचे छोटे तुकडे करून घ्या. साय फेटून घ्या आणि केशराच्या काडय़ा थोडय़ा कोमट पाण्यात घालून ठेवा. गॅसवर दूध ठेऊन एक उकळी येऊ द्या. मग आच मंद करून दूध आटवून घ्या. दुधाचं प्रमाण अर्ध व्हायला हवं. दूध भांडय़ाला लागू नये म्हणून अधून मधून हलवत राहा. दूध आटल्यावर त्यात काजूबदामाचे तुकडे, वेलची पूड आणि केशर घाला. दोन / तीन मिनिटांनी गॅस बंद करा. मिश्रण थोडं थंड होऊ द्या. आता थोडं दूध, केळं मिक्सरमध्ये वाटून घ्या. यानंतर हे मिश्रण भांडय़ात काढून त्यात कंडेन्स्ड मिल्क घाला आणि नीट फेटून घ्या. हे मिश्रण आटवलेल्या दुधात घाला. कुल्फीचं मिश्रण साच्यांमध्ये किंवा वाटय़ांमध्ये घाला. वाटय़ा ऍल्युमिनियम फॉईलने झाकून घ्या. साचे किंवा वाटय़ा फ्रिजरमध्ये ठेवा. आठ ते दहा तासांनी बाहेर काढा. गारेगार कुल्फी खा. आवडत असल्यास रोझ सिरपने सजावट करा.