क्विटोव्हा, मुगुरूझा विजयी
वृत्तसंस्था/ डोहा (कतार)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू झालेल्या कतार खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रूमानियाच्या माजी टॉप सीडेड सिमोना हॅलेपचे आव्हान फ्रान्सच्या गार्सियाने पहिल्याच फेरीत संपुष्टात आणले. झेकची क्विटोव्हा त्याचप्रमाणे स्पेनची मुगुरूझा यांनी विजयी सलामी दिली.
पहिल्या फेरीतील सोमवारी झालेल्या सामन्यात फ्रान्सच्या गार्सियाने सिमोना हॅलेपचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभवाचा धक्का देत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. 2014 साली हॅलेपने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. दुसऱया एका सामन्यामध्ये स्पेनच्या पाचव्या मानांकित मुगुरूझाने 90 मिनिटांच्या कालावधीत रूमानियाच्या सिरेस्टीचा 7-6 (7-4), 6-1 त्याचप्रमाणे या स्पर्धेतील विद्यमान विजेत्या झेकच्या पेत्रा क्विटोव्हाने रूमानियाच्या बेगुचा 6-3, 6-1 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. इस्टोनियाच्या कोंटाव्हेटने क्रोएशियाच्या ऍना कोंजुचा 6-2, 6-3, मार्टिनकोव्हाने स्विटोलिनाचा 6-7 (2-7), 7-5, 7-6 (7-5) तसेच ओस्टापेंकोने फ्रान्सच्या डोडिनचा 6-4, 6-2 असा पराभव करत पुढील फेरी गाठली.