वृत्तसंस्था/ हैद्राबाद
स्पेनचा फुटबॉलपटू एदुआर्दो एदू गार्सिया बरोबर इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया हैद्राबाद एफसी संघाने नुकताच नवा करार केला आहे. 2020-21 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात गार्सिया हैद्राबाद एफसीचे प्रतिनिधीत्व करेल.
स्पेनचा गार्सिया हा अनुभव आक्रमक फुटबॉलपटू असून गेल्यावर्षीच्या फुटबॉल हंगामात इंडियन सुपर लीग स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविणाऱया एटीके- मोहन बागान संघात गार्सियाचा समावेश होता. 2017 साली गार्सियाने प्रथमच भारतात प्रवेश केल्यानंतर तो बेंगळूर एफसी संघात दाखल झाला होता. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत गार्सियाने आतापर्यंत एकूण 47 सामन्यात 10 गोल नोंदविले आहेत.