वार्ताहर / बुगटेआलूर :
हडलगा (ता. हुक्केरी) येथील श्री काळभैरव मंदिर व गडहिंग्लजकडे जाणाऱया रस्त्याकडील शेतवडीमध्ये पावसाच्या पाण्याने भरलेल्या तळय़ामध्ये मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू झाला. सर्वेश बाळू राक्षे (वय 9) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी 3.30 वाजता घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी, वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे अद्याप शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान शाळांना सुटी असल्याने मुले अंघोळीसाठी विहीर, नदी आणि तलावात पोहण्यासाठी जात आहेत. हडलगा येथेही बुधवारी सर्वेश राक्षे, रोहन संतोष राक्षे व संकेत पांडूरंग पाटील हे तिघे घरातून खेळण्यासाठी गेले होते. दरम्यान शेतवाडीत असलेल्या तळय़ात साचलेल्या पाण्यात अंघोळीसाठी ते तिघेही उतरले होते. या तिघांनाही पोहता येत नव्हते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने आणि गाळ अधिक असल्याने सर्वेश बुडाला. तर रोहन ही गाळामध्ये अडकला होता. दरम्यान संकेत याने आरडाओरड करत वाचविण्यासाठी आटापिटा केला. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱया हडलगा येथील तानाजी भिंगले यांनी तळय़ाकडे धाव घेऊन रोहन याला बाहेर काढले. पण सर्वेश याला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी गेले असता त्याचा गाळात अडकून व श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला.
सर्वेश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश सर्वांचे मन हेलावून टाकणारा होता. सर्वेश व रोहन हे दोघे नेहमी एकत्र खेळत असत. या घटनेमुळे हडलगा गावावर शोककळा पसरली आहे. बुगटेआलूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी एम. एस. मुल्ला यांनी विच्छेदन करून मृतदेह कुटुंबाकडे सोपविला. घटनास्थळी संकेश्वर पोलीस ठाण्याचे पीएसआय गणपती कोगनोळी यांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.