गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत संपुष्टात
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळय़ांच्या भाडे कराराची मुदत संपली आहे. त्यामुळे गाळे रिकामी करण्याची सूचना महापालिकेच्या वतीने गाळेधारकांना करण्यात आली होती. या गाळय़ांचा फेरलिलाव कधी होणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. येत्या आठवडय़ात लिलाव प्रक्रियेची तारीख निश्चित होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील 181 गाळय़ांची मुदत संपली आहे. तसेच यापूर्वी देखील काही खुल्या जागा आणि गाळय़ांची मुदत संपली होती. त्याचप्रमाणे काही गाळे नव्याने भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. त्याकरिता लिलाव करण्यात येणार आहे. 181 गाळय़ांची मुदत 31 मार्च रोजी संपली आहे. पण गाळय़ांची मुदत संपण्यापूर्वी 3 महिने आधी नोटीस बजावून लीज वाढविण्यासाठी इच्छुक असलेल्या गाळेधारकांनी माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. पण याबाबत काही ठरावीक गाळेधारकांनी महापालिकेला संपर्क साधून गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.
काही गाळेधारकांना गाळे रिकामी करण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी केली होती. याकरिता 7 दिवसाची मुदत देण्यात आली होती. पण गाळेधारकांनी गाळे रिकामी केले नाहीत. त्यामुळे लिलाव प्रक्रिया राबविणार की नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत होता. पण पुढील आठवडय़ात लिलाव प्रक्रियेसाठी आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 300 गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.