मध्यवर्ती बसस्थानकासमोरील इमारत रिकामी करून वर्ष उलटले तरी दुरुस्तीचे काम नाहीच : आता गोवावेस येथे बहुमजली इमारतीचा प्रस्ताव
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकासमोरील व्यापारी संकुलाची इमारत जीर्ण झाल्याने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यादृष्टीने गाळे रिकामी करण्याची नोटीस गाळेधारकांना देण्यात आली होती. तसेच काही गाळेधारकांना हटविण्याची कारवाई महसूल विभागाने केली होती. मात्र वर्ष उलटले तरी अद्यापही क्यापारी संकुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. त्यामुळे गाळे रिकामी करण्यासाठी दुरुस्तीचे कारण पुढे करण्यात येत आहे का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
महसूल वाढीसाठी महापालिकेने विविध ठिकाणी व्यापारी संकुलांची उभारणी करून गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत. पण काही ठिकाणी व्यापारी संकुलांची दुरवस्था झाली असून मध्यवर्ती बसस्थानकासमोरील व्यापारी संकुलातील छताला गळती लागली आहे. तसेच इमारतीच्या छताचा गिलावा कोसळत आहे. इमारतीचे बांधकाम 1985 मध्ये करण्यात आल्याने काही भाग कोसळत चालल्याने इमारतीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे इमारतीमधील गाळेधारकांनादेखील धोका निर्माण झाल्याने इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
इमारतीच्या दुरुस्तीसह दुसऱया मजल्याचे बांधकाम हटवून नव्याने करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच विविध विकासकामे राबवून स्वच्छतागृह आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला होता. याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार करून महापालिका आयुक्तांकडे सादर केला होता. त्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त जगदीश के. एच यांनी अभियंत्यांसह मध्यवर्ती बसस्थानकासमोरील व्यापारी संकुलाची पाहणी केली होती. तसेच विकासकामे राबविण्यासाठी हिरवाकंदील दर्शविला होता. त्यामुळे गाळे रिकामी करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली होती. गाळेधारकांची भाडेकराराची मुदत संपल्याने गाळे रिकामी करण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच व्यापारी संकुलात कोणी प्रवेश करू नये, याकरिता प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. पण गाळे रिकामी करून वर्ष उलटले तरी अद्यापही संकुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही.
गोवावेस येथील गाळे रिकामी करण्याची सूचना
दुरुस्तीचे काम प्रलंबित असताना आता गोवावेस येथील व्यापारी संकुलाची इमारत जीर्ण झाल्याचे सांगून गाळे रिकामी करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आली आहे. पंधरा दिवसांत गाळे रिकामी करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे ही इमारत हटविणार की केवळ गाळेधारकांना हटविणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. तसेच गाळेधारकांना हटविण्यासाठी दुरुस्तीचे कारण पुढे करण्यात येत आहे का? अशी विचारणा होत आहे.