शौर्याबद्दल पोलिसांसह प्रशासनाकडून बक्षीस
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील रियासी जिह्यात रविवारी लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) दोन सशस्त्र दहशतवाद्यांना गावकऱयांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तालिब आणि फैजल अशी संबंधितांची नावे असून त्यापैकी एक मोस्ट वाँटेड कमांडरही आहे. त्यांच्याकडून दोन एके रायफल, सात ग्रेनेड आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी गावकऱयांना त्यांच्या शौर्याबद्दल 2 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. तसेच जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही धाडसी गावकऱयांना 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये राजौरी जिह्यातील रहिवासी तालिब हुसैन आणि पुलवामा जिह्यातील फैजल अहमद दार यांचा समावेश आहे. दोघांना तुकसान गावात पकडण्यात आले. फैजल हा नुकत्याच झालेल्या आयईडी स्फोटांचा मास्टरमाईंड असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. हे दोन्ही दहशतवादी गावात फिरत असताना गावकऱयांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यानंतर त्यांना जेरबंद करण्यासाठी काही जणांनी मिळून योजना आखली. त्यानुसार गावकऱयांनी दोघांनाही पकडून दोरीने बांधून ठेवले व स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले तसेच दोघांनाही ताब्यात घेतले. आता त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
दोन नवीन मॉडय़ूल उद्ध्वस्त
अलीकडच्या काही दिवसांत लष्कर-ए-तोयबा चिनाब खोरे आणि राजौरी-पुंछमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. काही दहशतवाद्यांना पुन्हा सक्रिय करण्यात संघटनेला यश आले आहे. यातून दोन मॉडय़ूल बनवण्यात आले होते. हे दोन्ही मॉडय़ूल उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे. या मॉडय़ूलमधील मुख्य दहशतवादी तालिब हुसेन फरार होता. तपास पथके त्याच्या मागावर असतानाच गावकऱयांनी दोन दहशतवाद्यांना पकडण्यात मदत केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे, असे जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले.
अमरनाथ यात्रेच्या मार्गाजवळ चकमक
यापूर्वी 30 जून रोजी भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिह्यात ऑपरेशन ‘कटरान’ दरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. बुधवारी कुलगाममध्ये झालेली चकमक अमरनाथ यात्रेच्या मार्गाच्या अगदी जवळ होती. बुधवारी संयुक्त कारवाई हाती घेत परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.