अंजनेयनगर येथील युवकावर गुन्हा : दहा हजार पिलांचा करार
प्रतिनिधी / बेळगाव
कुक्कुटपालन करणाऱया व्यावसायिकांना गावठी कोंबडय़ांची पिले पुरविण्याचे सांगून त्यांची फसवणूक करणाऱया बेळगाव येथील एका युवकाविरुद्ध येथील माळमारुती पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमकूर जिल्हय़ातील तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
अंजनेयनगर येथील हरिश कोटूर या युवकावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांचे सहकारी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. तिपटूर, जि. तुमकूर येथील अशोक एम. जी. या कुक्कुटपालन करणाऱया व्यावसायिकाला फसविल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अशोक एम. जी. हा मूळचा आंध्रप्रदेशमधील अनंतपूर जिल्हय़ाचा. तिपटूरजवळ त्याचा कुक्कुटपालन व्यवसाय आहे. गेल्या वषी फेसबुकवर त्याने एक जाहिरात पाहिली होती. हरिश कोटूर या युवकाने गावठी कोंबडय़ांची पिले पुरविण्याची जाहिरात केली होती. ती पाहून अशोकने हरिशशी संपर्क साधला व दहा हजार कोंबडय़ांची पिले पुरविण्याची मागणी केली.
प्रत्येकी 30 रुपये दराने कोंबडय़ांची पिले पुरविण्याचे सांगून एकूण किंमत 3 लाख रुपये होते. निम्मे पैसे भरल्यास कोंबडय़ांची पिले पुरविण्यात येतील. त्यानंतर निम्मे पैसे द्या, असे हरिश कोटूरने सांगितले.
बँक खात्यातून दिले 50 हजार
त्यानंतर 17 व 18 जुलै 2020 रोजी अशोक एम. जी. या तरुणाने आपल्या बँक खात्यातून एकदा 40 हजार व एकदा 10 हजार असे एकूण 50 हजार रुपये हरिश कोटूरच्या खात्यावर जमा केले. पैसे जमा करून सहा महिने उलटले तरी हरिशने कोंबडय़ांची पिले पुरविली नाहीत म्हणून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.