प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना थोपविण्यासाठी लॉकडाऊनची मुदत 3 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. या काळात मद्यविक्रीही बंद ठेवण्यात आली आहे. ही संधी साधून गावठी दारुची वाहतूक करणाऱया दोघाजणांना अबकारी विभागाने अटक केली आहे. बुधवारी सकाळी अलारवाड क्रॉसजवळ ही कारवाई करण्यात आली. तर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी नंदिहळ्ळी येथे एका युवकाला अटक केली आहे.
सौमेश इराप्पा सुळेभावी (वय 26), अकबर सलीम सुभेदार (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या दोघाजणांची नावे आहेत. अबकारी निरीक्षक मंजुनाथ मेळ्ळीगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी बुधवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास अलारवाड क्रॉसजवळ या जोडगोळीला अटक केली आहे.
केए 22, सी 4782 क्रमांकाच्या ऑटोरिक्षातून गावठी दारुची वाहतूक करण्यात येत होती. अधिकाऱयांनी त्यांच्याजवळून 160 लिटर दारुसाठा जप्त केला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून सौमेश व अकबर यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात अबकारी पहाटेच कर्तव्यावर असून त्यामुळे बेकायदा दारु वाहतुकीला आळा बसत आहे.