प्रतिनिधी/ सातारा
गावठी बनावटीचे पिस्तुल व काडतुसे विक्रीसाठी घेवून आलेल्या एका परप्रांतियास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत त्याच्या ताब्यातील पिस्तूल व 5 जिंवत काडतुसे असा 82 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बद्री सखाराम बिलालेपावरी वय 35 रा. सिंगूर, ता. गोगावा, जि. खरगोन, मध्यप्रदेश असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
दि. 4 रोजी बारामती ते फलटण रस्त्यावर असलेल्या सांगवी गावात एकजण गावठी पिस्तूल विक्री करण्यास येणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकास आरोपीस ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार तपास पथकाने सांगवी, ता. फलटण येथे सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान सांगवी येथे सापळा रचला असता त्या ठिकाणी एक इसम संशयितरित्या फिरताना आढळून आला. त्याला थांबण्याच्या सूचना केल्या असता तो पळून जाऊ लागला मात्र पथकातील कर्मचाऱयांनी त्याला शिताफीने पकडून ताब्यात घेतले. यावेळी पथकाने त्याच्याकडे चौकशी केली असता बद्री सखाराम बिलालेपावरी (वय 35) रा. सिंगूर, ता. गोगावा, जि. खरगोन, मध्यप्रदेश असे त्याने आपले नाव सांगितले.
त्याला ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीर, विनापरवाना एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण 82 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. त्याच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे तसेच पथकातील पोलीस हवालदार विनोद गायकवाड, सुधीर बनकर, पोलीस नाईक मोहन नाचण, संतोष जाधव, गणेश कापरे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव सावंत, मोहसीन मोमीन, गणेश कचरे यांनी सहभाग घेतला