मुंबई
: भारतीय क्रिकेटमध्ये सुनील गावसकर यांच्यासारखे अव्वल खेळाडू अतिशय कमी घडले आहेत. गावसकर जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहेत. अनेक युवा खेळाडू गावसकरांना आदर्श मानतच घडले. पण, याच गावसकरांचे माजी संघसहकारी किरण मोरे यांनी मात्र गावसकर हे नेट्समध्ये मी पाहिलेले सर्वात खराब खेळाडू आहेत, असे खळबळजनक वक्तव्य केले. ‘एखाद्या कसोटीपूर्वी एक दिवस आधी गावसकर सराव करत असत, त्यावेळी त्यांचे खराब फटके पाहून हे प्रत्यक्ष सामन्यात धावा कसे करणार, असा प्रश्न पडायचा. पण, एकदा क्रीझवर उतरल्यानंतर त्यांची बॅट लीलया चालायची आणि त्यांची गोलंदाजांवर तुटून पडण्याची ती विस्फोटकता डोळय़ाचे पारणे फेडणारे ठरायची’, असा मोरे यांचा आशय होता. गावसकरांनी कसोटीत 10 हजार धावा जमवताना 34 शतकेही झळकावली. पुढे, 2005 मध्ये सचिनने सनीचा विक्रम मोडीत काढला.