प्रतिनिधी / मडगाव
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे वडिल राया चोडणकर यांचे बुधवारी निधन झाले. राया चोडणकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यावर गेले काही दिवस गोमेकॉत उपचार सुरू होते. काल त्याची प्राणज्योत मालवली. कालच त्यांच्यावर कोरोना मार्गदर्शन तत्वाचे पालन करून अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्च्यात पत्नी श्रीमती लक्ष्मी, पूत्र : गिरीश (प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष), शैलेश, निलेश तसेच स्नुषा सौ. सुनिता, सौ. सरीता व सौ. संगीता तसेच विवाहित मुलगी : सौ. स्वप्ना समीर नाईक तसेच नातवंडे असा परिवार आहे.
राया चोडणकर यांच्या निधनावर काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, युवा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर, माजी आमदार धर्मा चोडणकर तसेच काँग्रेसच्या इतर नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.