नायजेरियन संशयिताला अटक : एलएसडीसह कोकिनही जप्त.एएनसीने केली कारवाई
प्रतिनिधी /पणजी
पोलीस खात्याच्या अमलीपदार्थ विरोधी विभागाने गिरी येथे केलेल्या कारवाईत 13 लाख 62 हजार रुपये किमंतीचे ड्रग्स जप्त केले असून या प्रकरणात एका नायजेरियन संशयिताला अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात 1985 एनडीपीएस कायद्याच्या 22 (सी) 21 (बी) कलाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव ऍनुलिग्वो कस्मीर चिबूझे (36) असून तो मूळ नायजेरियन असला तरी गेल्या काही वर्षापासून तो पर्रा येथे भाडय़ाच्या खोलीत राहत आहे.
सापळा रचून रंगेहात अटक
ऍनुलिग्वो हा ड्रग्स प्रकरणात असल्याची माहिती मिळताच पोलीस त्याच्यावर नजर ठेऊन होते. गिरी येथील डायगो चर्चजवळ असलेल्या पार्किंगच्या जागेत ड्रग्स विक्री करण्यासाठी ऍनुलिग्वो येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून 9.41 ग्रॅम एलएसडी द्रव्य व 42.28 ग्रॅम कोकिन जप्त केला आहे.
तीन दिवसांची पोलीस कोठडी
संशयिताला अटक केल्यानंतर रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. संशयित सध्या पेलीस कोठडीत आहे. ही कारवाई एएनसीचे निरीक्षक सुरज हळर्णकर व सिताकांत नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांनी केली आहे. उपनिरीक्षक अरुण देसाई पुढील तपास करीत आहेत.
ड्रग्जचा मोठा साठा गोव्यात
सध्या डिसेंबर महिना सुरु असल्याने राज्यात देशी विदेशी पर्यटक मोठय़ा प्रमाणात आले आहेत. नाताळापासून ते 31 डिसेंबरपर्यंत दर रात्री विविध ठिकाणी पाटर्य़ांचे आयोजनही केले जात आहे. त्यात सनबर्न पार्टी होणार असल्याचे संकेत दिसू लागल्याने गोव्यात मोठय़ा प्रमाणात ड्रग्स आले असल्याचा संशय आहे. पोलीसही वेळोवेळी ड्रग्स विक्रेत्यांना अटक करून त्यांच्याकडून ड्रग्स जप्त करीत आहेत.
शनिवारी मध्यरात्री ड्रग्स प्रकरणात अटक केलेला नायजेरियन संशयित हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून दोन वर्षापूर्वी त्याला कळंगुट पोलिसांनी मारहाण प्रकरणात अटक केली होती. राज्यात असलेले अधिकाधिक नायजेरियन हे ड्रग्स प्रकरणात असून पर्यंटन हंगाम सुरु झाला की त्यांच्या व्यवसायाला तेजी येत असते. मात्र पोलीसही त्याच जोमाने काम करीत असून नायजेरियन संशयितांच्या मुसक्या आवळीत आहेत.