माऊंट मनस्लू सर केल्याबद्दल सत्कार
प्रतिनिधी/कोल्हापूर
जगातील 14 अष्टहजारी शिखरांपैकी एक अती अवघड असणारे माउंट मनस्लू हे कोल्हापूरची गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हीने सर करून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. छत्रपती ताराराणी पुतळा, दसरा चौक येथे तिचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. भारतातील सर्वात कमी वयात माउंट मनस्लू शिखर सर करणारी कस्तुरी ही करवीर कन्या यशस्वी ठरली आहे. आज तिचे स्वागत करण्यासाठी कोल्हापुरातील गिर्यारोहण संस्थेचे पदाधिकारी व करवीर नगरीतील नागरिक मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.
कस्तुरीचे पाऊल करवीर नगरीतील छत्रपती ताराराणी पुतळा चौक येथे पडताच तुतारीचा निनादात स्वागत झाले. छत्रपती ताराराणी यांना वंदन करून सजवलेल्या जीप मधून कस्तुरी दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज पुतळा यांना अभिवादन करण्यासाठी निघाली. यावेळी तिने राजर्षी शाहू महाराज पुतळा, त्रपती शिवाजी महाराज पुतळा यांना पुष्पहार अर्पण करून माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा दृढ निश्चय केला.यावेळी तिचे वडील दीपक सावेकर व आई मनस्विनी सावेकर या दोघांनाही आनंद अश्रू आवरता आले नाहीत. मनपा उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या वेळी डॉ. अमर अडके यांनी मोहिमेची माहिती दिली. दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुखें यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पंडीत पोवार, शिवसेना शहर प्रमुख जयवंत हारूगले, हेमंत साळोखे, अरविंद कुलकर्णी, डॉ जे. एफ. पाटील, उद्योजक प्रसाद कामत, उमेश पोवार, यांनी कस्तुरीला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास करवीर हायकर्सचे संतोष कांबळे, विजय मोरे, उदय निचिते, उमेश कोडोलीकर, तेजस सावेकर, विक्रम कुलकर्णी, अनिल भोसले, आनंदा डाकरे, उपस्थित होते.