वृत्तसंस्था/ खाईस्टचर्च
सध्या भारत अ संघ न्यूझीलंडच्या दौऱयावर असून त्यांचा येथे न्यूझीलंड अ संघाविरूद्ध पहिला अनाधिकृत कसोटी सामना खेळविला गेला. भारत अ संघातील शुभम गिलच्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर भारत अ संघाने हा कसोटी सामना अनिर्णित राखला.
चार दिवसांच्या या सामन्यात भारत अ संघाने 2 बाद 127 या धावसंख्येवरून शेवटच्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. चौथ्या दिवसाअखेर भारत अ ने दुसऱया डावात 3 बाद 448 धावा जमवित ही कसोटी अनिर्णित राखली. भारत अ च्या दुसऱया डावात शुभम गिलने 279 चेंडूत 4 षटकार आणि 22 चौकारांसह नाबाद 204 तर हनुमा विहारीने 113 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 100 धावा झळकविल्या. या जोडीने चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 222 धावांची भागिदारी केली. त्याचप्रमाणे भारत अ च्या दुसऱया डावात प्रियांक पांचाळने 164 चेंडूत 115 धावा झोडपल्या. गिलचे हे दुसरे द्विशतक असून गेल्यावर्षी विंडीज विरूद्ध त्याने पहिले द्विशतक झळकविले होते. गिलची ही दोन्ही द्विशतकी विदेशात नोंदविली गेली आहेत.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱयावर असून भारताने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान न्यूझीलंडचा 5-0 असा व्हाईटवॉश रविवारी केला. आता उभय संघात वनडे आणि कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय कसोटी संघ लवकरच जाहीर करण्यात येणार असून शुभम गिलला संघात स्थान मिळू शकेल, असा अंदाज आहे.