प्रतिनिधी / सांगली
महापौर, उपमहापौरपदासाठी भाजपाकडून गीता सुतार आणि आनंदा देवमाने यांना संधी देण्यात आली. दोघांनीही माजी आमदार दिनकर पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी नगरसचिवांच्याकडे अर्ज दाखल केले. दरम्यान, महापौरपदाच्या उमेदवारीवरुन भाजपाअंतर्गत जोरदार कहल निर्माण झाला आहे. परिणामी महापौर पदासाठी प्रबळ इच्छुक असलेल्या सविता मदने, कल्पना कोळेकर यांच्यासह अन्य नगरसेविक तसेच भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी अर्ज भरण्यास दांडी मारली.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज स्वीकारण्यात आले. येत्या शुक्रवारी (ता.7) जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत या निवडी होणार आहेत. सत्ताधारी भाजपामध्ये महापौरपदासाठी तब्बल सात सदस्य इच्छुक होते. त्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली होती. यापैकी सविता मदने, गीता सुतार यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. कोअर कमिटीबरोबरच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी इच्छुकांसह सर्व नगरसेवकांशी संवाद साधत मते जाणून घेतली होती. त्यामुळे भाजपाकडून कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
सुतार, देवमानेंची बाजी
सोमवारी सकाळी येथील आमराई क्लबमध्ये भाजपा कोअर कमिटीसह सर्व नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेशउपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, सुरेश आवटी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीला खा. संजय पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून बंद पाकिटातून आलेली नावे सर्व नगसेवकांना वाचून दाखवली. यामध्ये महापौर पदासाठी गीता सुतार तर उपमहापौर पदासाठी आनंदा देवमाने यांचे नाव होते. सुतार व देवमाने यांचे नाव जाहीर होताच भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला. विशेषतः महापौरपदासाठी इच्छुक असणाऱयांचा अपेक्षाभंग झाला. त्यांनी बैठकीतच कारभाऱयांना धारेवर धरले.
अर्ज दाखल, नाराज गायब
दरम्यान, पक्षाचा आदेश अंतिम मानत गीता सुतार आणि आनंदा देवमाने यांनी अनुक्रमे महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले. यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, माजी महापौर सौ. संगीता खोत, सभागृह नेते युवराज बावडेकर, स्थायी समिती सभापती संदीप आवटी यांच्यासह काही नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान महापौर पदासाठी प्रबळ इच्छुक असलेल्या सविता मदने, कल्पना कोळेकर यांच्यासह भाजपाचे कारभारी तथा जेष्ठ नगरसेवक शेखर इनामदार यांनी यावेळी दांडी मारली. त्यांच्या नाराजीची चर्चा दिवसभर महापालिकेत सुरु होती. इनामदार मदने यांच्यासाठी आग्रही असल्याची चर्चा होती. मात्र कोअर कमिटीमधील अन्य सदस्यांनी त्यांना पत्ता काटल्याची चर्चा महापालिकेत सुरु आहे.
नाराजी नाही, पण सर्वांना व्हीप
भाजपामध्ये एकही सदस्य नाराज नाही. पक्षाच्या आदेशाप्रमाणे सुतार आणि देवमाने यांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपाच्याच उमेदवारांना मतदान करण्याचा व्हीप गटनेते युवराज बावडेकर यांनी नगरसेवकांना बजावला आहे, अशी माहिती माजी आमदार दिनकर पाटील यांनी दिली. दरम्यान, सोमवारी सायंकाळी भाजपाचे नगरसेवक गोवा येथे सहलीसाठी रवाना झाले.