गावातून पालखीची सवाद्य मिरवणूक : दुसऱया दिवशीही अलोट गर्दी
वार्ताहर /गुंजी
येथील सुप्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री माऊली देवीच्या यात्रोत्सवास विजयादशमीपासून पालखी सोहळय़ाने मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. श्री माऊली देवी गोवा, महाराष्ट्र, पुणे, मुंबईसह बेळगाव, खानापूर, लोंढा, रामनगर बरोबरच गुंजी पंचक्रोशीतील एक आराध्य दैवत असल्याने यात्रोत्सव काळात लाखेंच्या संख्येने भाविक सहभागी होतात त्यामुळे बुधवारी झालेल्या पालखी सोहळय़ास हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती दुपारी तीन वाजता श्री माऊली देवीच्या पालखीची गुंजी गावातून सवाद्य मिरवणूक होऊन उत्तरेकडील शमी आपटय़ाच्या झाडाखाली असलेल्या स्थळी शस्त्र पूजा करून विधिवत धार्मिक विधी करण्यात आल्या.
त्यानंतर पालखी श्री माऊली देवीच्या मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आल्या. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी पालखीवर गुलाल बुक्का, लाडू, पेढे, बर्फी व फुलांची उधळण केली. त्याचबरोबर पालखी मार्गात ओलांडीचे नवस बोललेल्या भाविकांनी खणा-नारळाची ओटी घेऊन ओलांडीचे नवस फेडले. पालखी मंदिरात जाऊन धार्मिक विधी नंतर गावात प्रवेश केल्यावर मागणीच्या बैलजोडय़ानी मंदिर प्रदक्षिणा केली. हे नयन मनोहरी दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. त्यानंतर मंदिराच्या समोर असलेल्या आपटय़ाच्या झाडाचे सोने लुटण्यात आले.
या यात्रोत्सवात गुरुवारी दुसऱया दिवशी सकाळपासूनच भाविकांची रीघ लागली होती दर्शनासाठी आलेल्या भाविकांना जवळजवळ दोन ते अडीच तास रांगेत थांबून दर्शन घ्यावे लागत होते त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत होते. यात्रोत्सवात गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रेत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्सव कमिटी बरोबरच पोलीस आणि स्वयंसेवकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
कोरोना काळामुळे गेल्या दोन वर्षापासून हा यात्रोत्सव मोठय़ा प्रमाणात झाला नव्हता. त्यामुळे अनेक भाविकांना दसऱयात देवी दर्शन घेता आले नव्हते. शिवाय यावषी या मंदिराचे जिर्णोद्धाराचे कार्य पूर्ण झाल्याने भव्य दिव्य सुंदर व आकर्षक असे मंदिर निर्माण झाल्याने माऊली यात्रेत मोठय़ा प्रमाणात भाविक येणार अशी अपेक्षा होती. आणि अपेक्षेप्रमाणेच पहिल्याच दिवशी भाविकांचा अलोट जनसागर लोटला होता.