अध्यक्षपदी लक्ष्मी घाडी, उपाध्यक्षपदी अन्नपूर्णा मादार
गुंजी :गुंजी ग्राम पंचायतीची अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड बिनविरोध झाली असून ग्राम पंचायतीच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी रमेश घाडी तर उपाध्यक्षपदी अन्नपूर्णा लक्ष्मण मादार यांची बिनविरोध निवड झाली आहे. गुंजी ग्राम पंचायतीमध्ये अध्यक्षपदासाठी ’सामान्य महिला’ आरक्षण तर उपाध्यक्षपदी ’अनुसूचित जाती’ आरक्षण आले होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता केवळ एकेक अर्ज आल्याने नोडल अधिकाऱयांनी ही निवड बिनविरोध जाहीर केली.
यावेळी गुंजी ग्राम पंचायतीच्या 12 सदस्यांपैकी 11 सदस्य हजर होते. एक सदस्य गैरहजर होता. अध्यक्ष-उपाध्यक्ष यांची निवड झाल्यानंतर पीडीओ प्रिती पत्तार यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले. नोडल अधिकारी म्हणून खानापूर तालुका कृषी अधिकारी डी. बी. चव्हाण यांनी काम पाहिले. निवड बिनविरोध करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक देसाई व मल्हारी करंबळकर यांनी परिश्रम घेतले.