उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये चकमक : उपअधीक्षकाचाही मृतांमध्ये समावेश, दोघांचा खात्मा करण्यात यश
कानपूर / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमध्ये कानपूरच्या ग्रामीण भागात शुक्रवारी झालेल्या एका चकमकीदरम्यान आठ पोलीस कर्मचाऱयांना प्राण गमवावे लागले. खतरनाक गुंड विकास दुबे याला अटक करण्याच्या कारवाईवेळी त्यांची पोलिसांशी चकमक उडाली. कानपूर पोलिसांच्या पथकावर गुंडांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपअधीक्षकांसह आठ जणांचा मृत्यू झाला. तसेच सात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. कानपूर ग्रामीणमधील शिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिकरू गावात गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही चकमक झडली. या संघर्षानंतर गुंड विकास दुबे फरार होण्यात यशस्वी झाला असला तरी त्याच्या दोन साथीदारांचा खात्मा करण्यात आला आहे.
पोलीस बिकरु गावात विकास दुबेच्या शोधात गेली असता गुंडांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलीस कर्मचाऱयांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत पोलिसांप्रती शोक व्यक्त केला आहे. सोबतच आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी डीजीपी आणि अपर मुख्य गृह सचिवांशीही चर्चा केली.
कानपूर पोलीस बिकरु गावात पोलिसांचे पथक विकास दुबेचा शोध घेत होते. पोलीस पथक गावाच्या बाहेर पोहोचताच, तेथे जेसीबी लावण्यात आला. यामुळे पथकाची गाडी गावाच्या आत जाऊ शकली नाही. पोलिसांचे वाहन आत जाऊ न शकल्याने सर्व पोलीस गावाच्या बाहेर उतरले. तेव्हा अगोदरच दबा धरून बसलेल्या गुंडांनी पोलिसांना घेराव घालून आणि इमारतीवरून गोळीबार केला. या हल्ल्यात पोलीस उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमधील चौघांची प्रकृती गंभीर आहे.
विकास दुबेवर 60 हून अधिक गुन्हे
विकास दुबे हा कानपूर भागात खतरनाक गुंड म्हणून ओळखला जातो. त्याच्या नावावर 60 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. राज्यमंत्री संतोष शुक्ला यांच्या हत्येप्रकरणी तो प्रमुख आरोपी आहे. उत्तर प्रदेशमधील राजनाथ सिंग सरकारमध्ये मंत्री दर्जा असलेल्या संतोष शुक्लाची 2001 मध्ये विकास दुबे याने पोलीस ठाण्यात घुसून हत्या केली होती. विकास दुबेच्या विरुद्ध काही दिवसांपूर्वी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता, अशी माहिती डीजीपी एचसी अवस्थी यांनी दिली.
दुबेला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान
घटनास्थळी फॉरेन्सिक विभाग पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकारी शुक्रवारी दिवसभरत तपासकार्यात गुंतले होते. घटनेत वापरण्यात आलेल्या हत्यारांबाबत माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू होते. आता आमचे लक्ष सर्व जखमी पोलीस कर्मचाऱयांना चांगले उपचार देण्यावर आहे. तसेच विकास दुबेविरुद्ध शोधमोहीम जारी ठेवायची आहे. पोलीस पथक दुबेसह त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी सक्रीयपणे काम करत असल्याचे अवस्थी यांनी स्पष्ट केले.