वार्ताहर/ अथणी
अथणी तालुक्यात गेल्यावर्षी कोरोनामुळे हाहाकार उडाला होता. मात्र काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांचे प्रमाण आटोक्यात आल्याने निश्चिंत बनलेल्या तालुकावासियांना शनिवारी मोठा धक्का बसला. तालुक्यातील गुंडेवाडी येथील एका 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा तालुक्यावर कोरोनाची दहशत पसरत आहे. सदर वृत्त कळताच आरोग्य खाते देखील सतर्क झाले असून गावामध्ये आरोग्य खात्याचे पथक दाखल झाले आहे.
गेल्यावर्षी पसरलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे अथणी व कागवाड तालुक्यामध्ये अनेकांचे बळी गेले. मात्र याचे प्रमाण ओसरल्याने कटू अनुभव विसरत येथील जनता पुन्हा एकदा कामाला लागली. मात्र गुंडेवाडी येथील व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजताच सर्वांमध्ये पुन्हा दहशत पसरली आहे. सदर व्यक्तीवर मिरज येथील एका दवाखान्यात उपचार सुरू होते.
अथणी तालुका आरोग्य अधिकारी बी. जी. कागे, अनंतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी सुरेश वालीकर यांनी गुंडेवाडीस भेट देऊन माहिती जाणून घेतली. शिवाय नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. कोरोना अद्याप पूर्णपणे गेलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी बेफिकीर न होता आवश्यक नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.