हल्ला प्रकरणी रिकी होर्णेकर याला अटक : गँगवॉरमधून झाला हल्ला : होर्णेकरची फातोर्डा पोलिस स्थानकात चौकशी सुरु
प्रतिनिधी / मडगाव
खतरनाक कारवायांसाठी राज्यात कुप्रसिद्ध असलेल्या अन्वर शेख उर्फ टायगर याचा काल मंगळवारी दुपारी आर्ले येथे गोळी झाडून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गँगवॉरमधून हा प्राणघातक हल्ला झाला असावा, असा अंदाज आहे. गुंड अन्वर शेख याला बांबोळी इस्पितळात हलविण्यात आले आहे. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सावर्डे येथील रिकी होर्णेकर याला अटक केली आहे.
आर्ले जंक्शनजळ हल्लेखोरांनी संधी साधून गुंड अन्वर शेख याच्यावर गोळी झाडली खरी, मात्र ही गोळी गुंड अन्वर शेख याच्या अंगावर न लागता पायावर लागली.
रिकी होर्णेकर याला अटक
पोलीस अधीक्षक सॅमी तावारीस व त्यांच्या सहकाऱयांनी आरोपी रिकी होर्णेकर याला अटक करण्यात साहाय्य केल्याचा दावा दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी केलेला आहे. मात्र, गुंड अन्वर शेख याच्यावर गोळी झाडल्यानंतर तेथे लगेच सॅमी तावारीस व त्यांचे साथीदार तेथे कसे पोहोचले याचा सामान्य माणसांना उलगडा झालेला नाही किंवा पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांनी यासंबंधी स्पष्टीकरणही दिलेले नाही.
आरोपी होर्णेकर याला फातोर्डा पोलीस स्थानकात आणण्यात आले असून त्य़ाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
गुंड अन्वर शेख याला जखमी स्थितीत सर्वप्रथम मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात नेले व नंतर बांबोळी येथील सरकारी इस्पितळात नेले. तेथे त्याच्यावर उपचार चालू आहेत. बांबोळी इस्पितळात असतानाच जखमी अन्वर शेख याची जबानी घेण्यात आली आहे.
गुंड अन्वर शेखची जबानी
या जबानीत जखमी अन्वर शेख याने या खुनी हल्यामागे रिकी होर्णेकर, तिळामळ- केपे येथील वेली डिकॉश्ता, सांताकुझ येथील इम्रान बेपारी, खारेबांद मडगाव येथील विपूल पट्टारी शिवाय आणखी सुमारे 6 जण असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या हल्लेखोरांनी अन्वर शेख याच्यावर लोखंडी सळी, कोयता, दांडय़ाने हल्ला केला. शिवाय एका हल्लेखोराने आपल्यावर गोळी झाडल्याची जबानी अन्वरने दिली आहे, अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांनी दिली.
या प्राणघातक हल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसानी या प्रकरणातील संशयिताविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 307, 143, 147, 148, तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या 3 व 5 कलमाखाली गुन्हा नोंद केला असून पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे.
गुंड अन्वरच्या विरोधात अनेक गुन्हे नोंद जखमी झालेला गुंड अन्वर शेख उर्फ टायगर याच्याविरुद्ध विविध पोलीस स्थानकात अनेक गुन्हे नोंद झालेले आहेत. मायणा कुडतरी पोलीस स्थानकाच्या हृद्दीतील रामनगरी येथे 25 वर्षीय युवकाला अडवून त्याच्यावर हल्ला केला होता. त्यावेळी फरारी झालेल्या गुंड अन्वर शेखला खांडोळा येथे अटक करण्यात आली होती.