प्रतिनिधी / सातारा :
व्यवसायातील गुंतवणुकीतून दरमहा 30 हजार रूपये देण्याचे आमिष दाखवून 6 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश बाळशिराम हाडवळे (रा. मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. योगेश धोंडीराम धुमाळ (वय 30, रा. सातारा) यांनी याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश धुमाळ यांना फेबुवारी ते 13 मार्च 2019 या कलावधीत मुंबई येथे राहत असलेले प्रकाश बाळशिराम हाडवळे यांनी व्यवसायात 6 लाखाची गुंतवणूक करण्यास सांगितले. यावेळी योगेश यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक वडगाव हवेली येथून ऑनलाईन ट्रॉन्झक्शन, तसेच पत्नीच्या चेकद्वारे एकूण 6 लाख रूपये दिले. या गुंतवणुकीवर योगेश यांना दरमहिन्याला 30 हजार रूपये परत देण्याची हमी संशयित प्रकाश यांनी दिली होती. परंतु दोन वर्ष होवूनही कोणतीही रक्कम परत न दिल्याने योगेश यांनी प्रकाश याच्याविरूद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हाडवले याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक फरांदे करत आहेत.