सात प्रकल्पांना मान्यता : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
प्रतिनिधी/ पणजी
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) सात प्रकल्पांना मान्यता दिली असून उद्योगांना सर्व प्रकारचे परवाने मिळणे सोपे व्हावे म्हणून नियम, अटी यामध्ये दुरुस्ती आणि सुधारणा करण्यात येणार आहे. या सात उद्योगांमध्ये 2228 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्याद्वारे 5827 जणांना रोजगार मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
आयपीबीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की उद्योग, प्रकल्प यांना मान्यता मिळाली तरी त्यांच्या फाईल्स कुठे ना कुठे तरी काही कारणाने अडकून पडतात आणि त्यांना परवाने मिळण्यास उशीर होतो. त्यामुळे संबंधित उद्योग, प्रकल्प वेळेवर चालू होऊ शकत नाही. त्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली आणि आयपीबीच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
आयपीबीने मान्यता दिलेल्या प्रकल्प, उद्योगांचा पाठपुरावा करुन त्यांना सर्व परवाने लवकर मिळावेत म्हणून प्रत्येक महिन्याला आयपीबीची बैठक घेण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. त्यात सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात येऊन प्रकल्प लवकरात लवकर सुरु व्हावेत म्हणून प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
इतर प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली तसेच आयपीबीच्या इतर संबंधित खात्यांशी समन्वय साधून तो वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. सावंत म्हणाले. खाणी सुरु करण्याबाबत दिल्ली येथे लवकरच बैठक होणार असून न्यायालयातही नवी तारीख मिळण्याची अपेक्षा डॉ. सावंत यांनी प्रकट केली. मान्यता मिळालेल्या प्रकल्पांना जलदगतीने पुढे जाण्याची व उत्पादन सुरु करण्याची वाट मिळावी म्हणून उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
आयडीसी व आयपीबी यांच्यात ताळमेळ आवश्यक : राणे
उद्योगमंत्री विश्वजित राणे हे बैठकीस उपस्थित होते. औद्योगिक विकास महामंडळ (आयडीसी) व गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ यांच्यात ताळमेळ घडवून आणला पाहिजे असे राणे म्हणाले. भूखंडाचे वितरण करताना हा ताळमेळ ठेवायला हवा. गोव्यात चांगले नवीन उद्योग प्रकल्प यावेत म्हणून सरकारचा प्रयत्न असून त्यातून अनेकांना नोकऱया मिळतील, अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली.