नवी दिल्लीः
गुगलने पुढील पाच वर्षाच्या कालावधीकरीता भारती एअरटेलमध्ये 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये 1.28 टक्के इक्विटी खरेदी व परस्पर सहकार्यावर व्यावसायिक करारांचा समावेश असणार आहे. भारती एअरटेलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 5 रुपये फेस व्हॅल्यूचे 7.1 कोटी इक्विटी समभाग जारी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. गुगल आपल्या गुगल फॉर इंडिया डिजिटायझेशन फंडअंतर्गत 1 अब्ज डॉलर्सची रक्कम भारती एअरटेलमध्ये गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक टप्याटप्याने पुढील 5 वर्षामध्ये केली जाणार असल्याचे गुगलकडून म्हटले आहे.
लावेल्ले नेटवर्कमध्ये हिस्सेदारी
दरम्यान दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलने बेंगळूरातील स्टार्टअप लावेल्ले नेटवर्क्समध्ये 25 टक्के हिस्सेदारी घेण्याची घोषणा केली आहे. सदरच्या कराराला नियामकाची मंजूरी मिळायची असल्याचे एअरटेलने म्हटले आहे.