ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
महत्त्वाच्या तारखा, दिनविशेष, अनेक दिग्गज, त्यांचे योगदाना सलाम करण्यासाठी गुगलकडून नेहमीच रंगीबेरंगी डूडल तयार केले जाते. त्याप्रमाणेच गूगलने आज भारतीय जलतरणपटू आरती साहा यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त खास डूडल बनवले आहे.
साहा यांना 1960 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहेत. साहा यांचा जन्म 24 सप्टेंबर 1940 साली कोलकातामध्ये झाला होता. त्या हुगळी नदीच्या किनाऱ्यावर पोहायला शिकल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भारतातील सर्वश्रेष्ठ जलतरणपटू सचिन नाग यांच्या देखरेखी मध्ये प्रशिक्षण घेतले. 5 व्या वर्षीच साहा पहिले सुवर्णपदक मिळविले होते. तर 11 व्या वर्षी जलतरणातील अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले होते.
बाराव्या वर्षी त्यांनी फिनलैंडची राजधानी हेलसिंकी मध्ये 1952 च्या ग्रीष्मकालीन ऑलम्पिकमध्ये सहभाग घेतला होता. भारतीय पुरूष मिहीर सेन यांची प्रेरणा घेऊन आरती यांनी इंग्लीश चॅनल पार करण्याचा प्रयत्न केला. 29 सप्टेंबर 1959 रोजी त्या आशियात असे करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. आरती यांनी 42 मैलचे अंतर केवळ 14 तास 20 मिनिटात पूर्ण केले होते. त्यांच्या अतूलनीय कामगिरीसाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होते.
1998 मध्ये भारतीय पोस्ट कार्यालयाने भारतीय महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्यावर एक तिकीट देखील प्रकाशीत केले होते.