काँगेसच्या संसर्गित आमदारांच्या आले होते संपर्कात
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असली आणि ते संसर्गमुक्त असले तरीही त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. मंगळवारी ते कोरोना संसर्गित काँग्रेस आमदाराच्या संपर्कात आले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांनी चाचणी करुन घेतल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. अतुल पटेल आणि डॉ. आर. के. पटेल यांनी सांगितले.
पुढील एक आठवडाभर ते एक आठवडाभर ते होमक्वारंटाईन राहणार असून वर्क फ्रॉम होम सुरु ठेवणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव अश्विनीकुमार यांनी सांगितले की, व्हीडिओ कॉन्फरन्सिंग, व्हीडिओ कॉलिंग व टेलिकॉलिंगच्या माध्यमातून ते प्रशासकीय कामकाज तसेच अधिकारी, मंत्र्यांच्या संपर्कामध्ये असतील. मुख्यमंत्री निवासामध्ये अगांतुकाला प्रवेश दिला जाणार नाही, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे आमदार इमरान खेडावाला आणि अन्य सदस्यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यातील खेडावाला यांना संसर्ग झाल्याचे सायंकाळी समजले होते. त्याआधी त्यांनी स्वॅब चाचणीकरता दिला होता. मात्र याची माहिती त्यांनी लपवून ठेवली व ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यास आल्याची मोठी चूक केली आहे, असे गुजरातचे नगरनिगम आयुक्त विजय नेहरा यांनी म्हटले आहे.