ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असतानाच सत्ताबदलाबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गुजरातमध्ये पडद्यामागे नेतृत्त्व बदलाच्या हलचाली सुरू होत्या. त्यामुळे विजय रुपानी यांनी काल तडकाफडकी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. रुपानी यांच्या राजीनाम्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी आज भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होण्याची शक्यता असल्याचे भाजपाचे राज्य प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितले.
यमल व्यास म्हणाले, रुपानी यांच्या राजीनाम्यानंतर नव्या मुख्यमंत्री निवडीसाठी आज भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, नरेंद्र तोमर भाजपाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून गुजरातला भेट देणार आहेत. त्यावेळी ही बैठक होऊ शकते. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपचे सर्व आमदारही उपस्थित राहतील. दरम्यान, गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून विद्यमान केंद्रीय अरोग्यमंत्री मनसुख मांडवीय व उपमुख्यमंत्री नितीन पटेल, विद्यमान मंत्री आर. सी. फालदू, दादरा-नगरहवेली, लक्षव्दीपचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांची नावे शर्यतीत आहेत.