गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्सविरुद्ध शेवटच्या चेंडूवर 6 गडी राखून रोमांचक विजय
मुंबई / वृत्तसंस्था
शुभमन गिलने 59 चेंडूत 96 धावांच्या धमाकेदार खेळीसह मजबूत पायाभरणी केल्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवर सलग 2 षटकार खेचण्याचे शिवधनुष्य अगदी लीलया पेलत राहुल तेवातियाने गुजरात टायटन्ससाठी विजयाचा कळस चढवला! ब्रेबॉर्नवर शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीने लढवल्या गेलेल्या या आयपीएल साखळी सामन्यात पंजाबने 9 बाद 189 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात गुजरातने 20 षटकात 4 बाद 190 धावांसह तोडीस तोड प्रत्युत्तर देत रोमांचक विजय साकारला!
विजयासाठी 190 धावांचे आव्हान असताना सलामीवीर मॅथ्यू वेड 6 धावांवर बाद झाल्याने गुजरातची खराब सुरुवात झाली. मात्र, शुभमन गिल व साई सुदर्शन (30 चेंडूत 35) यांनी दुसऱया गडय़ासाठी 11.2 षटकात 101 धावांची भरभक्कम शतकी भागीदारी साकारली आणि इथेच त्यांच्या विजयाची भक्कम पायाभरणी झाली. गिल शतकाच्या उंबरठय़ावर बाद झाल्याने आणि साई सुदर्शन, हार्दिक पंडय़ा ऐन मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने गुजरातचा संघ अचानक अडचणीत आला. पण, शेवटच्या 2 चेंडूत 12 धावांची गरज असताना स्ट्राईकवर आलेल्या तेवातियाने पाचवा चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेने तर सहावा चेंडू लाँगऑफच्या दिशेने उत्तुंग षटकारासाठी पिटाळून लावत संस्मरणीय विजय संपादन करुन दिला!
तत्पूर्वी, पंजाबने निर्धारित 20 षटकात 9 बाद 189 धावा केल्या, त्यात लिव्हिंगस्टोनचा 27 चेंडूत 64 धावांचा वाटा सर्वोच्च ठरला. लिव्हिंगस्टोनने 7 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. रशिद खानने 22 धावात 3 तर दर्शन नळकांडेने 37 धावात 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्स ः 20 षटकात 9 बाद 189 (लियाम लिव्हिंगस्टोन 27 चेंडूत 7 चौकार, 4 षटकारांसह 64, शिखर धवन 30 चेंडूत 4 चौकारांसह 35, जितेश शर्मा 11 चेंडूत 23, राहुल चहर नाबाद 22. रशिद खान 3-22, दर्शन नळकांडे 2-37, शमी, पंडय़ा, फर्ग्युसन प्रत्येकी 1 बळी).
गुजरात टायटन्स ः 20 षटकात 4 बाद 190 (शुभमन गिल 11 चौकार, 1 षटकारासह 96, साई सुदर्शन 30 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 35, हार्दिक पंडय़ा 18 चेंडूत 27. रबाडा 2-35, राहुल चहर 1-41).
त्या शेवटच्या षटकात काय घडले?
विजयासाठी शेवटच्या षटकात 19 धावांची आवश्यकता असताना ओडियन स्मिथने पहिला चेंडू वाईड टाकला व त्यानंतर हार्दिक पंडय़ाला रनिंग बिटविन द विकेट्समध्ये गोंधळ उडाल्यानंतर धावचीत होत तंबूत परतावे लागले. उर्वरित 5 चेंडूत 18 धावांची गरज असताना तेवातियाने एकेरी धाव घेतली तर मिलरने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार फटकावला. शेवटच्या 3 चेंडूत 13 धावा आवश्यक असताना मिलरला केवळ एकच धाव घेता आल्याने शेवटच्या 2 चेंडूत 2 षटकार फटकावण्याचे कठीण आव्हान होते आणि हा सामना जवळपास गुजरातच्या हातातून निसटलाच होता. मात्र, तेवातियाने पाचवा चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेने तर सहावा व शेवटचा चेंडू वाईड ऑफ बियाँड लाँगऑफच्या दिशेने षटकारासाठी पिटाळून लावत संस्मरणीय विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले!