ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये म्यूकोरमाइकोसिसचा (काळी बुरशी) धोका वाढला आहे. गुजरात सरकारने अशा रुग्णांसाठी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड सुरू केले आहेत. तसेच म्यूकोरमाइकोसिसच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या 5000 वायल्सही खरेदी केल्या आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 परिस्थितीवरील कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये म्यूकोरमाइकोसिसच्या 19 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा रुग्णांच्या उपचारासाठी या हॉस्पिटलमध्ये 60 खाटांसह दोन स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. वडोदरा, सुरत, राजकोट, भावनगर, जामनगर आणि इतर ठिकाणी सरकारी रुग्णालयांमध्येही अशाच सुविधा उभारल्या जातील.
राज्याच्या आरोग्य विभागाने या आजाराच्या उपचारासाठी 3.12 कोटी रुपये खर्च करून ॲम्फोटेरिसिन-बी 50 एमजी इंजेक्शनच्या 5000 वायल्स खरेदी केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकार केव्हा खरेदी करणार ‘म्यूकोरमाइकोसिस’च्या वायल ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.