कोव्हॅक्सिनच्या निर्मितीला गती मिळणार
अहमदाबाद/ वृत्तसंस्था
‘कोव्हॅक्सिन’चे उत्पादन वाढविण्यासाठी ‘भारत बायोटेक’ने गुजरातमधील तीन औषधनिर्मिती कंपन्यांशी करार केल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. या करारांमुळे कोव्हॅक्सिन लसीच्या निर्मितीला गती मिळणार आहे. यापूर्वी अन्य काही कंपन्यांशीही करार करण्यात आले असून कर्नाटकमध्ये एका स्वतंत्र प्लान्टमध्येही निर्मिती केली जात आहे.
गुजरात सरकारच्या मालकीच्या ‘गुजरात बायोटेक रिसर्च सेंटर’बरोबरच खासगी क्षेत्रातील हेस्टर बायोसायन्स आणि ओम्नीबीआरएक्स बायोटेक्नॉलॉजी या कंपन्यांनी भारत बायोटेकशी कोव्हॅक्सिनच्या तंत्रज्ञान हस्तांतरणासंबंधी एका करार पत्रावर सह्या केल्या आहेत. या तीन कंपन्या मिळून दर महिन्याला दोन कोटी कोव्हॅक्सिनची निर्मिती करणार असल्याचे समजते. गेल्या आठवडय़ात निती आयोगाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के पॉल यांनी ‘भारत बायोटेक’ लसनिर्मिती वाढविण्यासाठी इतर वैद्यकीय कंपन्यांच्या संपर्कात असल्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यांनी कोणत्याही कंपन्यांची नावे जाहीर केली नव्हती. आता ही गुजरातमधील तीन कंपन्यांची नावे उजेडात आली आहेत.
देशात सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु असला तरी लसींचा मोठय़ा प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अनेक लाभार्थींना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिल्यानंतर दुसऱया डोससाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र असल्यामुळे देशातील लस निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या माध्यमातून लसींचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे.