ऑनलाईन टीम / भरूच :
गुजरातच्या भरूच परिसरातल्या पटेल वेलफेअर रुग्णालयाला शुक्रवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पटेल वेलफेअर रुग्णालयातच कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर देखील बनवण्यात आले होते. आग लागण्याची घटना घडली, तेव्हा रुग्णालयात कोरोना रुग्ण देखील होते. मात्र, आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचे काम सुरू करण्यात आले. आग लागण्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग विझवण्याचे काम सुरू केले. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
भरूचचे एसपी. राजेंद्र सिंह चुडास्मा यांनी सांगितले की, या घटनेत या कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेले 14 रुग्ण आणि दोन नर्सेसचा मृत्यू झाला आहे. जवळपास 50 जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
- मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत
दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. “भरूच रुग्णालयात जीव गमावलेल्या रुग्णांप्रती मी शोक व्यक्त करतो. राज्य सरकार या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर करत आहे, अशी घोषणा विजय रुपाणी यांनी केली आहे.