दहेज पेस्टिसाइड कंपनीत दुर्घटना : 57 जण जखमी
भरूच / वृत्तसंस्था
गुजरातच्या भरूच जिल्हय़ातील दहेज विशेष आर्थिक क्षेत्रातील एका पेस्टिसाइड कंपनीत झालेल्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 57 जण जखमी झाले आहेत. या स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यशस्वी रसायन प्रायव्हेट लिमिटेडच्या साठवणूकगृहात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे अधिकाऱयांनी सांगितले आहे.
दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी भरूच येथील अनेक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर लागलेली आग विझविण्यासाठी कंपनीच्या परिसरात अग्निशमन दलाची 15 वाहने त्वरित पोहोचली आहेत. स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने सुमारे 20 किलोमीटर अंतरावरील गावे आणि भावनगर जिल्हय़ातही आवाज ऐकू आला आहे. स्फोटानंतर उठलेला धूराचा लोट भावनगरमध्येही दिसून येत होता. स्फोटामुळे परिसरातील काही एलएनजी पेट्रोनेटच्या कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचांना तडा गेला आहे. खबरदारी दाखल जिल्हा प्रशासनाने कंपनीनजीकच्या लुवारा आणि लखिगाम गावातील लोकांना अन्यत्र हलविले आहे.