रिलायन्सकडून जामनगरमध्ये होणार निर्मिती
वृत्तसंस्था/ जामनगर
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड गुजरातच्या जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय निर्माण करणार आहे. पुढील 2 वर्षांमध्ये हे प्राणिसंग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुले होणार असल्याचे मानले जात आहे.
जगातील या सर्वात मोठय़ा प्राणिसंग्रहालयात विविध प्रजातींचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे जीव ठेवण्यात येणार आहेत. तेथे जगभरातील हिस्स्यातून प्राणी तसेच पक्षी आणले जाणार आहेत. हा प्रकल्प रिलायन्सचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांचे कनिष्ठ पुत्र अनंत यांच्या देखरेखीत पूर्ण होत आहे.
हे प्राणिसंग्रहालय 280 एकरमध्ये निर्माण होणार आहे. जामनगरमधील रिलायन्स तेलशुद्धीकरण प्रकल्पानजीकच हे प्राणिसंग्रहालय असणार आहे. टाळेबंदी आणि कोरोना महामारीमुळे या प्रकल्पाला विलंब झाला असला तरीही पुढील 2 वर्षांमध्ये तो पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाला ग्रीन्स जियोलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन किंगडम नाव देण्यात आले आहे. केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध विभागांची अनुमती मिळाल्याची माहिती रिलायन्सच्या कॉर्पोरेट अफेयरचे संचालक परिमल नाथवानी यांनी दिली आहे.
प्राणिसंग्रहालयात फॉरेस्ट ऑफ इंडिया, फ्रॉग हाउस इंसेक्ट, लाइव ड्रगन लँड, एक्झॉटिकाचे बेट, वाइल्ड ट्रेल्स ऑफ गुजरात, ऍक्वेटिक किंगडम या नावाने विविध विभाग निर्माण करण्यात येणार आहेत. तेथे प्राण्यांना अनुकूल असे वातावरण उपलब्ध करण्यात येणार आहे.
बार्किंग डियर्स, फिशिंग कॅट्स, स्लोथ बियर्स (अस्वल), कोमोडो ड्रगन्स हे प्राणी यातील मुख्य आकर्षण ठरणार आहेत. आफ्रिकन सिंह, चित्ता, 20 जिराफ, 12 शहामृग, आफ्रिकन हत्ती यासारखेही प्राणी सामील असतील. तर फ्रॉग हाउसमध्ये 200 प्रकारचे बेडूक तर ऍक्वेटिक किंगडमध्ये 350 प्रकारचे मासे उपलब्ध असतील.