पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रम, सीएनजी प्रकल्पाचाही समावेश
अहमदाबाद / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये 20 हजार कोटी रुपयांच्या विविध जनोपयोगी आाणि औद्योगिक प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे. ते सध्या गुजरातच्या 2 दिवसांच्या दौऱयावर आहेत. या प्रकल्पांमध्ये कचऱयापासून इंधन वायू बनविणाऱया सीएनजी प्रकल्पाचाही समावेश आहे. तसेच पांरपरिक औषध पद्धतीसंबंधीच्या जागतिक केंद्राचेही उद्घाटन त्यांनी केले.
‘कचऱयातून सोने’ संकल्पनेअंतर्गत कचऱयापासून इंधन वायू निर्माण करणाऱया प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले. बनास डेअरी या कंपनकडून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. देशभरात ही कंपनी असे अनेक प्रकल्प निर्माण करणार आहे. पाळीव आणि दुभत्या जनावरांच्या शेणापासून, अर्थात गोबरपासून इंधन वायू निर्माण करणारा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱयांना लाभ होणार असून जनावरांच्या शेणाचेही त्यांना पैसे मिळतील. तसेच गावे स्वच्छ राहतील, असे प्रतिपादन या प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदींनी केले.
या बायो-सीएनजी प्रकल्पात प्रतिदिन 30 लाख लीटर दुधावर प्रक्रिया केली जाणार आहे. या दुधापासून लोणी, आइस्क्रीम, खवा, दुधाची भुकटी, चॉकलेट्स आदी अनेक उत्पादने बनविली जाणार आहेत. केवळ दुधापासूनच नव्हे, तर बटाटय़ापासूनही विविध पदार्थ बनविले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.
पशुपालकांचे उत्पन्न चौपट
बनासकाठा विभागातील विविध दुग्धोत्पादन प्रकल्पांच्या माध्यमातून येथील पशुपालकांचे उत्पन्न जवळपास चौपट वाढले आहे. पूर्वी 280 कोटी रुपयांचे एकंदर उत्पन्न सर्वांच्या मिळून पदरात पडत असे. मात्र, आता ही रक्कम 1000 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. बनास डेअरी प्रकल्पाच्या 151 शाखांच्या संकुलाचे उद्घाटनही पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
पारंपरीक औषध पद्धती
जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध संशोधन केंद्राचे उद्घाटन जामनगर येथे करण्यात आले. या प्रसंगी मॉरिशचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल आदी मान्यवर उपस्थित होते. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. अदानोम घेबेयसस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. भारताच्या पारंपरिक औषध पद्धतीसंबंधी आपल्याला खूप अभिमान आणि आदर वाटतो. ही पद्धती परिणामांच्या दृष्टीने अतिशय प्रभावी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आयुष उत्पादनांना प्रचंड मागणी
आज गुरुवारपासून गांधीनगर येथे जागतिक आयुष गुंतवणूक आणि संशोधन शिखर परिषदेचा प्रारंभ होत आहे. यानिमित्त आयुष विभागाचे सचिव राजेश कोटेचा यांनी माहिती दिली. आयुष उत्पादनांना भारतात तसेच जगभरात मोठी मागणी असून 2014 ते 2020 या सहा वर्षांच्या कालावधीत 18.1 अब्ज डॉलर्सची उलाढाल झालेली आहे. योग, आयुर्वेद, नेचरोपॅथी, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या सहा पारंपरीक औषध पद्धतींवर आता नव्याने भर दिला जात असल्याची महत्वपूर्ण बाब कोटेचा यांनी अधोरेखित केली.