प्रतिनिधी / बेळगाव
कोविड केअर सेंटर असलेल्या संत मीरा हायस्कूल येथे कोविडग्रस्तांना दररोज तीन वेळचे जेवण श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ यांच्यावतीने देण्यात येत आहे. मंडळाचा हा उपक्रम गेल्या 15 दिवसांपासून सुरू असून कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण हे गुजरात भवनमध्ये बनविले जाते. त्यामुळे पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांनी गुजरात भवनला भेट देऊन पाहणी केली आणि मंडळाच्यावतीने चालू असलेल्या कार्याचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.
श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ गेल्या 60 वर्षांपासून प्रकाश अन्नसेवा देत आहे. त्यामुळे या कोरोनाच्या काळातसुद्धा त्यांनी कोरोनाग्रस्तांना आणि कोरोनायोद्धय़ांना सकाळचा अल्पोपाहार, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देऊन आपली अन्नसेवा निरंतर चालू ठेवली आहे. यावेळी गुजरात भवनचे सदस्य अन्नदानाची मनापासून सेवा बजावत आहेत हे पाहून विक्रम आमटे यांनी अत्यंत आनंद झाल्याचे सांगितले. यावेळी संस्थापक सदस्य श्री भूपेंद्र पटेल, विजय भद्रा, भाविन पटेल, भावेश चुडासमा, श्रेयश दोशी, दक्षेत राणा, विपुल पटेल, गौरंग राणा, तेजस दोशी, बिजल राणा, नितीन भद्रा आणि हर्षल पटेल, महादेव ठोकणेकर व राहुल पाटील उपस्थित होते.