वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील सोमवारी झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सने हरियाणा स्टिलर्सचा 32-26 अशा सहा गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात गुजरातने सुरूवातीपासूनच आपली पकड मजबूत करताना हरियाणाच्या खेळाडूवर दडपण राखले होते.
या सामन्यात गुजरात संघातील प्रमुख रायडर्स अजयकुमार आणि प्रदीपकुमार यांची कामगिरी दर्जेदार झाली. अजयकुमारने सुपर 10 गुणांसह एकूण 11 गुण मिळविले तर प्रदीपकुमारने एका टॅकल गुणांसह एकूण 10 गुण घेतले. या संपूर्ण सामन्यात हरियाणा स्टीलर्सने केवळ 5 टॅकल गुण मिळविले. या सामन्यात मध्यंतरापर्यंत गुजरातने हरियाणावर 19-12 अशी आघाडी मिळविली होती. पूर्वार्धात हरियाणाचे दोनवेळा सर्वगडी बाद झाले. सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना गुजरातने 8 गुणांची आघाडी मिळविली होती.