पहिल्या चारही सामन्यात नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघच विजयी!
मुंबई / वृत्तसंस्था
राहुल तेवातिया (24 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 40), डेव्हिड मिलर (21 चेंडूत 30), हार्दिक पंडय़ा (28 चेंडूत 33) व मॅथ्यू वेड (29 चेंडूत 30) यांच्या जोरदार फटकेबाजीच्या बळावर गुजरात टायटन्सने लखनौ सुपरजायंट्स संघाविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात 5 गडी राखून रोमांचक विजय प्राप्त केला. गुजरातसह लखनौसाठी देखील आयपीएल स्पर्धेतील हा पहिला सामना होता.
लखनौने 20 षटकात 6 बाद 158 अशी आव्हानात्मक धावसंख्या रचली तर प्रत्युत्तरात गुजरातने 19.4 षटकात 5 बाद 161 धावांसह विजय संपादन केला. गुजरातला शेवटच्या 5 षटकात 68 धावांची गरज असताना हुडा व बिश्नोई यांच्या महागडय़ा गोलंदाजीने सामन्याचा सर्व नूर पालटला. तेवातिया व मिलर यांनी फटकेबाजी केल्यानंतर अभिनव मनोहरने फिनिशिंग टच दिला.
तत्पूर्वी, दीपक हुडा व आयुष बदोनीच्या झंझावाती अर्धशतकांमुळे लखनौ सुपरजायंट्सने 6 बाद 158 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. मोहम्मद शमीने आघाडी लाईनअपला अक्षरशः सुरुंग लावलेला असतानाही केवळ हुडा व बदोनीच्या अर्धशतकांमुळेच लखनौला दीडशतकी मजल पार करता आली. शमीने आयपीएल इतिहासातील आणखी एक भेदक मारा साकारत 25 धावात 3 बळी, असे लक्षवेधी पृथक्करण नोंदवले. हुडा व बदोनी यांनी 68 चेंडूत 87 धावांची भागीदारी साकारली.
हुडाने 41 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार तर बदोनीने 4 चौकार व 3 षटकार खेचत चौफेर फटकेबाजी केली. हुडाला 16 व्या षटकात रशिद खानने (1-27) पायचीत केले. कृणाल पंडय़ानेही नाबाद 21 धावांचे योगदान दिले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर लखनौचा कर्णधार केएल राहुल (0) शमीच्या डावातील पहिल्याच अप्रतिम चेंडूवर यष्टीमागे झेल देत तंबूत परतला होता.
संक्षिप्त धावफलक
लखनौ सुपरजायंट्स ः 20 षटकात 6 बाद 158 (दीपक हुडा 41 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 55, आयुष बदोनी 41 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह 54, कृणाल पंडय़ा 13 चेंडूत 3 चौकारांसह 21, इव्हिन लुईस 10. अवांतर 4. मोहम्मद शमी 4 षटकात 3-25, वरुण ऍरॉन 4 षटकात 2-45).
गुजरात टायटन्स ः19.4 षटकात 5 बाद 161 (राहुल तेवातिया 24 चेंडूत नाबाद 40, हार्दिक पंडय़ा 28 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 33, मॅथ्यू वेड 29 चेंडूत 4 चौकारांसह 30, डेव्हिड मिलर 21 चेंडूत 30. चमीरा 2-22).
कोण आहे हा आयुष बदोनी?
22 वर्षीय आयुष बदोनी हा मूळचा उत्तराखंडचा. 11 जून 2021 रोजी त्याने दिल्लीतर्फे सईद मुश्ताक अली स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमश्रेणी टी-20 पदार्पण केले. 2018 मध्ये यू-19 आशिया चषक स्पर्धेत लंकेविरुद्ध लढतीत अवघ्या 28 चेंडूत 52 धावांची आतषबाजी खेळी साकारत त्याने लक्ष वेधून घेतले होते. 4 वर्षांनंतर आयपीएल पदार्पणाच्या लढतीत आणखी एक दणकेबाज अर्धशतक नोंदवत तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. लखनौने फेब्रुवारीतील मेगा ऑक्शनमध्ये आयुषला 20 लाख रुपयांच्या बोलीसह करारबद्ध केले आहे.