वृत्तसंस्था/ नवी मुंबई
सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सने सलग तीन सामने जिंकले असून आता सोमवारी येथे होणाऱया सनरायजर्स हैदराबाद संघाबरोबरच्या सामन्यात आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी सज्ज झाला आहे.
नवी मुंबईतील डी.आय.पाटील स्टेडियमवर सोमवारी गुजरात आणि हैदराबाद यांच्यातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल. या स्पर्धेत गुजरात टायटन्सने आपल्या पदार्पणात दर्जेदार कामगिरी करत सलग तीन सामने जिंकले आहेत. हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची क्षमता पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात सिद्ध केली आहे. हैदराबाद संघाचे नेतृत्व न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनकडे सोपविण्यात आली आहे. गुजरात संघातील शुभमन गिल चांगल्याच फॉर्ममध्ये असून पंजाबविरूद्धच्या सामन्यात त्याने वैयक्तिक या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदविली आहे. गिलला मॅथ्यु वेड आणि साई सुदर्शन तसेच राहुल तेवातिया यांची साथ मिळाली तर सोमवारच्या सामन्यात गुजरात संघाला सलग चौथा विजय मिळविणे अवघड जाणार नाही. रशीद खान, मोहम्मद शमी, हार्दिक पंडय़ा, जयंत यादव हे या संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. हैदराबाद संघाची फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने कर्णधार केन विल्यम्सन तसेच अभिषेक शर्मा, मार्करेम, पुरन, वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर राहील. शनिवारी झालेल्या सामन्यात अभिषेक शर्माने 75 धावांची आपल्या संघाला विजय मिळवून देणारी खेळी केली होती. भुवनेश्वरकुमार, श्रेयस गोपाल, टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर आणि जान्सन यांच्यावर हैदराबाद संघाच्या गोलंदाजीची भिस्त राहील. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. मैदानावर सायंकाळी दव पडत असल्याने दुसऱयांदा फलंदाजी करणाऱया संघाला विजयाची अधिक शक्यता असल्याचे जाणवते.