ऑनलाईन टीम/तरुण भारत
गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर गेल्या वर्षी पकडलेल्या 2988 किलो हेरॉईनप्रकरणी तपास यंत्रणेनं आरोपपत्र दाखल केलंय. या प्रकरणी एनआयएनं एकूण 16 जणांना आरोपी बनवलंय. NIA ने सोमवारी गुजरातमधील बंदरातून भारतात 2,988 किलो अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी 11 अफगाण नागरिक आणि एका इराणीसह 16 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. हे आरोपपत्र एनआयएच्या विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलंय.
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाने मिळालेल्या माहितीच्या आधारे छापेमारीत करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. दोन वेगवेगळ्या कंटेनरमध्ये प्रक्रिया केलेल्या टाल्क स्टोनच्या आवरणाखाली तब्बल २,९८८ किलोग्रॅम हेरॉईन ड्रग्ज सापडलं. अमली पदार्थांची तस्करी करणारी ही जहाजं अफगाणिस्तानमधून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आली होती. यानंतर गुजरातमध्ये ठिकाठिकाणी छापेमारी करत कारवाई केली होती. यासर्व प्रकारानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या प्रकरणाचा तपास करत आहे.