भाजपच्या दबावाचा आम आदमी पक्षाचा आरोप
सुरत / वृत्तसंस्था
आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार कांचन जरीवाला यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ‘आप’ आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कांचन जरीवाला मंगळवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते. भाजपच्या नेत्यांनी जरीवाला यांचे कुटुंबीयांसह अपहरण केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नते गढवी यांनी केला आहे. याचदरम्यान एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये सुरत-पूर्वमधील आपचे उमेदवार कांचन जरीवाला अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक अधिकाऱयांच्या कार्यालयात जाताना दिसत आहेत.
सुरतमधील आमचे उमेदवार कांचन जरीवाला आणि त्यांचे कुटुंबीय कालपासून बेपत्ता आहेत. यापूर्वी भाजपने त्यांचा अर्ज रद्द करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला होता. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. त्यांचे अपहरण झाले आहे का?’ असा प्रश्न ‘आप’चे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता.