ऑनलाईन टीम / गांधीनगर :
भारतीय जनता पार्टीच्या गुजरात प्रदेशाध्यक्षपदी खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी जीतूभाई वाघाणी यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
चंद्रकांत पाटील हे सीआर पाटील म्हणून गुजरातमध्ये ओळखले जातात. ते मूळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पिंपरी आक्राउट येथील आहेत. 1960 मध्ये भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर पाटील यांचे कुटुंब गुजरातमध्ये स्थलांतरित झाले. सीआर पाटील हे गुजरातमधील नवसारी येथील खासदार आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय समजले जातात.
सी.आर.पाटील यांनी सुरत महानगराला कर्मभूमी म्हणून दत्तक घेतले होते. 25 डिसेंबर 1989 रोजी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर सुरत शहर भाजपच्या खजिनदारपदाची जबाबदारी 5 वर्षे आणि शहर भाजपचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी 2 वर्षे सांभाळली. गुजरातमधील आगामी पोटनिवडणुका, जिल्हा व तालुका पातळीवरील निवडणुकांसह विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असेल.