वृत्तसंस्था/ सुरत
विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत यजमान गुजरातने साखळी फेरीत आपली विजयी घोडदौड कायम राखताना अ गटातील रविवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात बडोदा संघाचा 40 धावांनी पराभव केला. त्याचप्रमाणे अन्य सामन्यात हैद्राबादने गोव्याचा तर छत्तीसगडने त्रिपुराचा 5 गडय़ांनी पराभव केला.
गुजरात आणि बडोदा यांच्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजराथने 50 षटकांत 7 बाद 277 धावा जमविल्या. त्यानंतर बडोदा संघाने 50 षटकांत 9 बाद 237 धावापर्यंत मजल मारली. गुजरातच्या डावात रावलने 102, हित पटेलने 82 धावा जमविल्या. बडोदा संघातर्फे सेठने 53 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर बडोदा संघाच्या डावात स्मित पटेलने 73, विष्णु सोळंकीने 37 धावा जमविल्या. गुजराततर्फे पीयूष चावलाने 3 तर चिंतन गजाने 2 गडी बाद केले.
या स्पर्धेतील दुसऱया सामन्यात हैद्राबादने गोव्याचा केवळ दोन धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैद्राबादने 50 षटकांत 6 बाद 345 धावा जमविल्या. तन्मय अगरवालने 150, तिलक वर्माने 128 धावा केल्या. गोवा संघातर्फे गर्ग आणि प्रभू देसाई यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर गोवा संघाने 50 षटकांत 5 बाद 343 धावा जमविल्या. एकनाथने नाबाद 169, स्नेहल कवठणकरने 116 धावा झळकविल्या. हैद्राबादतर्फे रवि तेजाने 3 तर संदीपने 1 गडी बाद केला.
छत्तीसगडने त्रिपुराचा 5 गडय़ांनी पराभव केला. त्रिपुराचा डाव 48.4 षटकांत 230 धावांत आटोपल्यानंतर छत्तीसगडने 47.1 षटकांत 5 बाद 233 धावा जमवित विजय मिळविला. अमनदीप खरेने नाबाद 101, तिवारीने 30 धावा जमविल्या. त्रिपुरातर्फे परवेझ सुल्तान आणि मुरा सिंग यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
गुजरात 50 षटकांत 5 बाद 277, बडोदा 50 षटकांत 9 बाद 237
हैद्राबाद 50 षटकांत 6 बाद 345, गोवा 50 षटकांत 5 बाद 343
त्रिपुरा 48.4 षटकांत सर्वबाद 230, छत्तीसगड 47.1 षटकांत 5 बाद 233.