प्रतिनिधी / बेळगाव
ख्रिश्चन बांधवांचा महत्त्वाचा सण म्हणून ‘गुड फ्रायडे’ ओळखला जातो. याचदिवशी येशूंनी आपले बलिदान दिले होते. तो दिवस शुक्रवार असल्याने याला ‘गुड फ्रायडे’ म्हटले जाते. याचे औचित्य साधून ख्रिश्चन बांधवांनी चर्चमध्ये जावून सामूहिक प्रार्थना केली. यावषी कोरोनामुळे निर्बंध आल्याने अत्यंत साध्या पद्धतीने हा सण आचरणात आणला गेला.
बेळगावमध्येही गुडफ्रायडेनिमित्त विविध चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली. यासाठी शुक्रवारी सकाळपासून चर्चबाहेर ख्रिश्चन बांधव जमा झाले होते. घरोघरीही प्रभू येशूख्रिस्तांना अभिवादन करण्यात आले. फादर डेरेक फर्नांडिस यांनी फातिमा कॅथेड्रल चर्च येथे प्रार्थना सभेत सहभाग घेतला. प्रभू येशूनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन जगाला पापमुक्त केले. याचप्रमाणे सध्या जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटामधूनही येशूंनी जगाला बाहेर काढावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.
हिंडलगा येथील सेंट जॉन द बॅपिस्ट चर्च येथे विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. फादर ऑस्टीन जॉन यांनी प्रभावी असे प्रवचन केले. क्रूसला पूर्वी कोणतेच महत्त्व नव्हते. परंतु येशूख्रिस्तांच्या बलिदानानंतर ते गौरवाचे व विजयाचे चिन्ह म्हणून पाहिले गेले, असे त्यांनी सांगितले.
शहर तसेच परिसरात गुडफ्रायडे निमित्त कोरोनाचे निर्बंध पाळत सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या. इमॅक्मयुलेट कन्फेक्शन चर्च येथे फादर कॅझेटन डिसोझा, सेंट ऍन्थोनी चर्च येथे फादर विजय मेंडिल, शहापूर येथील माऊंट कॅरमेल चर्च येथे फादर मायकल वाघ यांनी प्रार्थना केली. सर्वांना या कार्यक्रमात सहभागी होता येत नसल्याने कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.