प्रतिनिधी / पन्हाळा
गुडे ता.पन्हाळा येथील वकीलाच्या मुलाकडुनच आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केल्याची, मानवतेला काळीमा फासणारी अशी घटना उघडकीस आली.याबाबत सिद्धेश सुरेश कदम वय:19 वर्षे रा.गुडे या तरुणावर पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीची आई हिने संबंधित तरुणाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. या झालेल्या घटनेमुळे संबंधित तरुणाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया परिसरातुन उमटत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीन मुलीची आई,दोन मुली व पती असे गुडे गावात राहण्यास आहेत. गुडे गावातील सिध्देश कदम या युवकाने मे 2021 मध्ये देखील या घटनेतील अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केले होते. पण त्यावेळी हा प्रकार वाद नको म्हणुन कोणाला सांगितले नाही. पण दिनांक 23 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा सिद्धेश कदम या तरुणाने अल्पवयीन मुलीला शाळेत जात असताना आडवुन, तिला आपल्या मोबाईल मधील घाणेरडे व्हिडीओ दाखवुन तिच्याशी अश्लील वर्तन केले. यावेळी या अल्पवयीन मुलीने तरुणाला शिव्या देत घरी जावुन झालेला प्रकार सांगितला. असे फिर्यादीत म्हंटले आहे.
या झालेल्या अजब प्रकारामुळे गावातील संतप्त महिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी अल्पवयीन मुलीच्या आईने संबंधित तरुणाने आठ वर्षाच्या चिमुकलीशी अश्लील वर्तन करुन विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली. त्यामुळे तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेबद्दल संपुर्ण बांधारी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान तरुणाला कठोर शासन व्हावे अशी मागणी देखील होत आहे. या तरुणाला रात्री उशिरा अटक करण्यात येणार असल्याचे पन्हाळा पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष जाधव करत आहेत.