ऑनलाईन टीम / मुंबई :
मराठमोळा सण असलेला गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे यंदाही 13 एप्रिल 2021 रोजी साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार गुढीपाडवा सणानिमित्त राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार, सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित आहे.
दरम्यान, राज्यात काही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र, कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये.
तसेच, या कठीण परिस्थितीत सोशल डिन्स्टन्सिंगचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून घरगुती गुढी उभारून सण अत्यंत साधेपणाने साजरा करा, असे आवाहन ही करण्यात आले आहे.
गुढीपाडवा सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/ रक्तदान शिबिरे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आयोजित करता येतील. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृतीही करता येईल. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना कोविड विषयक सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.