सांगली/प्रतिनिधी
उद्या असलेल्या गुढीपाडवा या सणासाठी लागणाऱ्या साखरेच्या माळा, बांबूच्या काठ्या, आदी साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. या साहित्यांची खरेदी करण्यासाठी सांगलीकरांनी बाजारात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच गुढी पाडव्याच्या निमित्ताने शहरात गीत कार्यक्रम, शोभा यात्रा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
चैत्र या मराठी महिन्याचा पहिलाच दिवस गुढीपाडवा म्हणून राज्यभर हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने लागणाऱ्या साखरेच्या माळा, बांबूच्या काठ्या, शेवयांची पाकीटे, नववर्षाचे पंचांग आदी साहित्यांनी बाजार फुलून गेला आहे. मागील वर्षी १४० रुपये किलो दर असणाऱ्या साखरमाळा यंदा साखरेची दरवाढ, वाहतूक खर्च, मजुरी आदींमध्ये दरवाढ होवूनही गतवर्षीच्याच दरात विक्री सुरु आहे. या लाल, पिवळ्या पांढऱ्या व गुलाबी रंगात असणाऱ्या साखर माळांच्या स्टॉलनी बाजार फुलून गेला आहे. त्याचबरोबर या सणासाठी लागणाऱ्या बांबूच्या काठयांचेही ठिकठिकाणी स्टॉल लागले असून, त्या ५० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत.
मराठी नववर्षाची सुरवात गुढीपाडवा या सणापासून होत असल्याने बाजारामध्ये नवनवीन मराठी पंचांगांनीही ठाण मांडले आहे. यामध्ये दाते, रुईकर, लाटकर आदी पंचांग बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहेत. या दिवशी घरोघरी केल्या जाणाऱ्या गोडधोड पदार्थांमध्ये शेवयांना अग्रक्रम असल्याने अनेक दुकानांतून शेवयांची पाकीटेडी उपलब्ध झाली आहेत. या शेवया ६० रुपये किलो दराने विक्रीस आहेत. या सर्व साहित्यांच्या खरेदीसाठी सांगलीकरांनी बाजारपेठेत गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच गुढी पाडव्याच्या निमित्ताने शहरात गीत कार्यक्रम, शोभा यात्रा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.