70 जणांना पुरविले किराणा सामान : निरीक्षक दत्तगुरू सावंत यांचा पुढाकार
डिचोली / प्रतिनिधी
गोवा राज्य पोलिस खात्याच्या गुन्हा शाखेत सेवा बजावणाऱया पोलिसांतर्फे डिचोली, साखळी व वाळपई येथील रिक्षाचालक व मोटरसायकल पायलटांना किराणा सामानाचे वितरण करून त्यांना या कठीण काळात मदतीचा हात दिला. सुमारे 70 जणांना या पोलिसांनी किराणा माल प्रदान केला.
गुन्हा शाखेचे निरिक्षक दत्तगुरू सावंत यांच्या नेतृत्वाखाली या शाखेतील हवालदार दिनेश पिकुळकर, पोलिस शिपाई नविन पालयेकर, कल्पेश शिरोडकर, संजय गावकर व किरण परब यांनी आपल्या वेतनातील पैसे गोळा करीत रिक्षाचालक व मोटरसायकल पायलटांना मदतीचा हात दिला.
सध्या सुरू असलेल्या लॉकडाउन काळात मोटरसायकल पायलट व रिक्षाने भाडी मारून आपले पोट चालविणाऱया या सेवकांनाही मोठा परिणाम झाला होता. या काळात लोक बाहेर पडत नसल्याने या मोटरसायकल पायलट व रिक्षावाल्यांना भाडी मिळत नसल्याने त्यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. या समस्येतून या सेवकांना बाहेर काढण्यासाठी गुन्हा शाखेच्या पोलिसांनी त्यांना स्वतःच्या पगारातील पैसे गोळा करून मदत केली.
समाजातील अडलेल्या घटकांना मदत करण्यात असलेले आत्मकि समाधान या सेवेमुळे प्राप्त झाले असून अशा लोकांना मदत करण्यासाठी आम्ही सदैव पुढे असणार. सामाजिक जबाबदारीला न्याय देताना आपली सरकारी सेवा बजावताना लोकांना वेळप्रसंगी मदतीचा हातही देणे आमचे कर्तव्य आहे. आणि आम्ही ते पार पाडत आहोत, असे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी सांगितले.