ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण जग कोरोना संकटात सापडले असताना गुन्हेगारी टोळ्यांकडून विषारी मिथेनॉलचा वापर करून हँड सॅनिटायझर विक्री केली जात आहे. तसेच पीपीई किट आणि इतर आवश्यक साधनांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी बनून गुन्हेगारी टोळ्यांनी लुट सुरू केली आहे. सीबीआयकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
कोरोना संकटात आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. इंटरपोलने सीबीआयला याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार सीबीआयने तातडीने पोलीस अधिकाऱ्यांना सावध केले आहे.
गुन्हेगारी टोळ्यांकडून मिथेनॉलचा वापर करून बनावट हँड सॅनिटायझर तयार केले जात आहे. या टोळीचा दुसरा गट पीपीई किट आणि कोरोनाशी संबंधित साहित्य मेडिकलमध्ये पुरवत आहे. रुग्णालयांकडून साहित्याची ऑर्डर मिळाल्यानंतर साहित्य देत नाहीत. कमी वेळेत पैसे कमावण्यासाठी गुन्हेगार कोरोनाच्या या परिस्थितीचा फायदा घेत आहेत, असे सीबीआयकडून सांगण्यात आले.