ऑनलाईन टीम / पुणे :
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या.
गृहमंत्री देशमुख यांनी कोरोना आणि त्यानिमित्ताने निर्माण झालेली परिस्थिती जाणून घेतली. पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी पुणे शहर पोलिसांनी हद्दपार आरोपीतांकरीता केलेल्या “ExTra” (Tracking of Externees) ॲपची माहिती दिली.
पुणे शहरामधून हद्दपार झालेल्या इसमास त्याने पुन्हा पुणे शहरात येवुन गुन्हेगारी कृत्य करू नये याकरीता “ExTra” (Tracking of Externees) ॲप विकसित करण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीची सुरूवात करण्यात आली आहे. या ॲपमुळे हद्दपार गुन्हेगारास गुन्हेगारी कृत्य करण्यापासून परावृत्त करण्याचा मुख्य उद्देश साध्य होईल. हद्दपार आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. हद्दपार गुन्हेगारावर निगराणी / देखरेख करणे सोयीस्कर होईल. कमी मनुष्यबळामध्ये परिणामकारकरित्या गुन्हेगारावर निगराणी ठेवणे शक्य होईल. हद्दपार आदेशाचे उल्लघंन होवून दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होवून पोलीस तपास यंत्रणेवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी ‘स्मार्ट पोलिसिंग’ बाबत माहिती दिली. बैठकीस इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.